कृषी

कृषि व्यवस्थापन तंत्रज्ञानाने उत्पादन वाढवा – सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विसकीत केलेले बियाणे व तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांपर्यंत प्रभाविपणे पोहचल्या असून शेतकर्यांनी कृषि व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
कृषि विस्तार व संज्ञापन विभागांतर्गत मांजरसुंबा येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. अहिरे बोलत होते. याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे, उपसरपंच जालिंदर कदम, कृषि पर्यवेक्षक विजय सोमवंशी, डॉ. चारुदत्त चौधरी, कृषि सहाय्यक अभिजीत डुके, डॉ. मनोहर धादवड, राजू राठोड उपस्थित होते. डॉ. अहिरे पुढे म्हणाले की माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या समस्या, शासकीय योजनांबाबतच्या सूचना यांच्याबाबत विचार विनिमय करुन शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून धोरणात्मक शासकीय तसेच विद्यापीठ स्तरावर नियोजन करण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद चवई यांनी केले. प्रा. किर्ती भांगरे यांनी कांदा उत्पादन तंत्रज्ञान या विषयी, डॉ. चारुदत्त चौधरी यांनी पिकावरील कीड व्यवस्थापन, डॉ. सखेचंद अनारसे यांनी बियाणे तंत्रज्ञान, विजय सोमवंशी यांनी शासनाच्या कृषि विभागातंर्गत शेतकरी योजना व अनुदान याविषयी मार्गदर्शन केले. उपसरपंच जालिंदर कदम यांनी गावातील तरुण शेतकरी राबवित असलेल्या विविध उपक्रमांविषयी आढावा घेतला. कांदाचाळ अनुदान वाढ व्हावी, फळबाग योजनेत सर्व शेतकर्यांचा समावेश व्हावा ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणी, कृषि यंत्रे व औजारे याबाबत उपस्थित शेतकर्यांना सूचना केल्या. प्रगतशील शेतकरी भागवत कदम, चंद्रभान कदम, संतोष कदम, जयराम कदम यांचेसह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रय भूतकर यांचे फुले संगम या सोयाबीन प्रक्षेत्रास मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली. सूत्रसंचालन कु. कल्याणी बचाटे व कु. समीक्षा अव्हाळे यांनी केले. आभार डॉ. गोरक्ष ससाणे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कृषि महाविद्यालय, हळगांव व कृषि महाविद्यालय, विळदघाट येथील ग्रामीण कृषि जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिकन्यांनी केले.

Related Articles

Back to top button