अहमदनगर

कृषि विद्यापीठाच्या बेकरी पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या बेकरी पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण, वनस्पती रोग शास्त्र व कृषि अनु जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू आमोलिक, उद्यान विद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. ढाकरे, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. बाबासाहेब भीटे व विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे उपस्थित होते.
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त काल 15 ऑगस्ट च्या मुहूर्तावर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या बेकरी युनिटमध्ये संशोधनात्मक पद्धतीने निर्माण होणाऱ्या खाद्यपदार्थांचे लॉन्चिंग विद्यापीठाच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ प्रायोगिक तत्त्वावर बेकरी पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या आयुर्वेदिक कुकीजमध्ये प्रामुख्याने फुले जांभूळ कुकीज, फुले त्रिफळा कुकीज, फुले तुलसी कुकीज, फुले कडीपत्ता कुकीज, फुले जिंजर (आले) कुकीज व फुले मशरूम कुकीज यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट, 2021 रोजी या विभागाने विकसित केलेल्या आयुर्वेदिक कुकीजमध्ये फुले शतावरी कुकीज, फुले अश्वगंधा कुकीज, फुले पुदिना कुकीज, फुले बेहडा कुकीज आणि फुले आवळा कुकीज यांचे लॉन्चिंग केले होते.
विद्यापीठाच्या या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाने पौष्टिक व आयुर्वेदिक खाद्यपदार्थांची निर्मिती अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचारी वर्ग, विद्यार्थी तसेच इतर सर्वांनी चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने या खाद्यपदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये फूड ऍज मेडिसिन म्हणून करावा व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी असे आवाहन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी यावेळी केले. डॉ. चव्हाण यावेळी त्यांच्या या विभागाविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की आतापर्यंत या विभागातून 229 विद्यार्थ्यांनी एम. एस. सी. व 12 विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी मिळविलेली आहे. या विभागामध्ये शेतीपूरक कृषी मालाची काढणी, हाताळणी, प्रतवारी, साठवण, प्रक्रिया व विक्री याविषयी संशोधन केले जाते. फळे व भाजीपाला प्रक्रिया व बेकरी तंत्रज्ञान या विषयातील एक महिना कालावधीचे प्रशिक्षण वर्ग राबवून त्याद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व महिला बचत गटांना लघुउद्योग उभारण्यास आवश्यक असणारे तांत्रिक मार्गदर्शन देऊन मदत केली जाते.
आज अखेर फळे व भाजीपाला प्रक्रिया यामध्ये 36 व बेकरी व्यवसाय तंत्रज्ञानामध्ये 24 असे एक महिना कालावधीचे प्रशिक्षण वर्ग राबविलेले असून त्यामध्ये अनुक्रमे 661 व 315 प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविलेला आहे. त्यापैकी 30 प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःचा फळे व भाजीपाला प्रक्रिया व्यवसाय सुरू केलेला आहे तसेच पंधरा प्रशिक्षणार्थींनी स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणामध्ये तसेच बेकरी व्यवसाय प्रशिक्षण वर्गामध्ये निर्माण होणाऱ्या पदार्थांची विक्री या केंद्रामार्फत केली जाणार असून या पदार्थांना ग्राहकांचा प्रतिसाद किती प्रमाणात आहे याचाही अभ्यास केला जाणार आहे. याचबरोबर या बेकरी पदार्थ विक्री केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना विविध पदार्थांची विक्री करणे बाबतचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button