कृषी

कृषि क्षेत्रातील समस्यांचे निवारण हवामानावर आधारीत कृषि सल्ला सेवेने शक्य-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ / जावेद शेख : हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर येणार्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवा हे महत्वाचे साधन असुन माहिती आणि दळणवळणाच्या साधनांचा वापर केल्यास हवामानावर आधारित कृषी सल्ला वेळेत शेतकर्यांपर्यंत पोहचवणे शक्य होईल जेणे करून हवामान बदलामुळे कृषि क्षेत्राचे कमीतकमी नुकसान होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. जागतिक बँक अर्थसहाय्यित, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती आणि दळणवळणाच्या साधनांद्वारे हवामानावर आधारित कृषी सल्ला सेवा या विषयावर तीन आठवड्याचा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेड, नवी दिल्लीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होते. या प्रसंगी डॉ. के.के. सिंग, प्रमुख, कृषी सल्ला सेवा विभाग, भारतीय हवामानशास्त्र विभाग, नवी दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून म्हणून नवी दिल्ली येथील प्रोसोईल प्रकल्प जीआयझेडचे व्यवस्थापक राजीव अहल हे उपस्थित होते.

    डॉ. के.के. सिंग यावेळी मार्गदर्शन करतांना हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर होणार्या परिणामांची व भारतीय हवामानशास्त्र विभाग, नवी दिल्ली अंतर्गत करता येणार्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अहल यांनी प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेड व मफुकृवि, राहुरी यांच्या सहयोगी उपक्रमांची माहिती दिली व कास्ट प्रकल्प, राहुरी यांनी कोरोना काळात सुरु केलेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे कौतुक केले. या अभ्यासक्रमाचे संयोजक म्हणून डॉ सुनिल गोरंटीवार व प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेड, नवी दिल्लीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. इंद्रनील घोष, सहसंयोजक म्हणून प्रकल्प सहप्रमुख (कास्ट) डॉ. मुकुंद शिंदे, व इंजि. रणजीत जाधव, तांत्रिक सल्लागार, प्रोसोईल प्रकल्प, जीआयझेड, पुणे, संचालक म्हणून डॉ.रवि आंधळे, प्राध्यापक (हवामानशास्त्र), सहसंचालक म्हणून डॉ. जयवंत जाधव, विभाग प्रमुख, हवामानशास्त्र यांनी काम पहिले. तसेच या अभ्यासक्रमाचे नियोजन संशोधन सहयोगी डॉ वैभव मालुंजकर, डॉ स्नेहल कानडे व इंजि. मोहसीन तांबोळी यांनी केले. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी देशभरातून एकूण १०५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून त्यांना कृषी हवामानशास्त्र विषयातील देशभरातील ३५ तज्ञ वैज्ञानिकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Related Articles

Back to top button