पश्चिम महाराष्ट्र

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची बैठक संपन्न

राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र बहाल
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे पदाधिकारी निवडीसंबंधी व मुस्लीम आरक्षण विषयी ठोस भूमिका घेण्यासाठी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आदर्श महाविद्यालय मायनी रोड विटा याठिकाणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मुस्लिम ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून मुस्लिम आरक्षणासंबंधी राज्यातील कोणताही पक्ष ठाम भूमिका घेत नाही,न्यायालयाने मुस्लिम आरक्षण देण्यासंबंधी सकारात्मक भूमिका घेऊन सुद्धा राजकीय इच्छाशक्ती अभावी मुस्लिम आरक्षण प्रलंबित आहे, यावर राज्यभर मुस्लिम समाजाचे प्रबोधन करून मुस्लिम समाजाला आरक्षण संबंधी जागृत करणे या हेतूने सदरील बैठक आयोजित केलेली होती.
यावेळी बोलताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी म्हणाले की, आज मुस्लिम समाजामध्ये या ओबीसी आरक्षणामुळे कित्येक मुस्लिम समाजातील मुले आयएएस अधिकारी, न्यायाधीश, पोलीस अधिकारी, डॉक्टर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदाधिकारी, नगरसेवक, सभापती, महापौर अशी विविध पदे भूषवित आहेत. हे फक्त आणि फक्त या ऑर्गनायझेशनमुळेच, जर ही ऑर्गनायझेशन संघटित झाली नसती तर आज मुस्लिम समाज सर्वात जास्त मागासलेला असता आणि आता तर या समाजासाठी आरक्षण ही एक काळाची गरज बनलेली आहे. जर आपण एकत्र येऊन संघटित नाही झालो तर, आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य हे पूर्णपणे अंधारात जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने विशेष करून तरुणांनी संघटित होऊन आपण एक समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.
यावेळी बोलताना सांगली जिल्हाध्यक्ष राजूभाई शिकलगार म्हणाले की, हाजी शब्बीरभाई अन्सारी हे मुस्लिम समाजाचे बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी अनेक यातना सोसून अनेक संघर्ष करून ही चळवळ उभी केली आहे. खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचे प्रबोधन हाजी शब्बीरभाई अन्सारी करत आहेत आणि त्यांच्यामागे आपण सर्व एकजुटीने काम करत आहोत याचा आपणास अभिमान आहे. यावेळी आलेल्या मान्यवरांचे आयोजकांच्यावतीने आभार मानण्यात आले.
यावेळी मुबारक मुल्ला यांची विटा शहराध्यक्षपदी, परवेझ तांबोळी यांची कडेगाव शहराध्यक्षपदी, मुसा इनामदार यांची कडेगाव तालुकाध्यक्षपदी, चंदुलाल शेख यांची जत तालुका अध्यक्षपदी, जावेद वीभुसे यांची वाळवा तालुका अध्यक्षपदी, मैनुद्दीन मुल्ला यांची विटा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या बैठकीला शब्बीरभाई अन्सारी, राजू भाई शिकलगार, सातारा जिल्हाध्यक्ष मिटकरी, हारूण मुल्ला, बाबासाहेब मोमीन, शिराज पटेल, हाजी फिरोज बागवान, डॉ. राजू तांबोळी, आलम शेख, सिकंदर मुल्ला व संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button