ठळक बातम्या

आनंदाच्या शिध्याला रेंजचे ग्रहण

बाळकृष्ण भोसले | राहुरी : शिंदे – फडणवीस सरकारच्या दिवाळी सणासाठीच्या महत्वाकांक्षी ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमाला रेंजचे ग्रहण लागले असून सकाळ पासून शिधापत्रिका धारकांनी लावलेल्या दुकानासमोरच्या  रांगा दुपारपर्यंत कायमच दिसल्या. गोरगरिबांना याचा मोठा फटका बसल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
सध्याच्या अत्युच्च महागाईच्या काळात गोरगरिबांच्या घरात थोडेफार गोडधोड व्हावे व त्यांचा सण साजरा करण्यात सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत दिवाळी सणाला आनंदाचा शिधा नांव देत रवा, साखर, पामतेल, व हरभरा डाळ या चार वस्तू शिधापत्रिकेवर देण्याचा निर्णय घेतला. उशीराने घेतलेल्या या निर्णयाने जाहीर केलेली किट शिधापुरवठा दुकांनावर पोहोचण्यासाठी दिवाळी तोंडावर आली. घाईगडबडीत घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असताना मात्र किट पोहोचण्यासाठी उशीर झाला.
ग्रामीण भागातील काही ठिकाणी किट पोहोच झाल्या तर काही ठिकाणी अजून पोहोचल्याच नाहीत तर पोहोचलेल्या ठिकाणी २१ व २२ ऑक्टोबर या दोन दिवशीच किट वाटपाचा कार्यक्रम स्थानिक शिधापुरवठा दुकानदारांनी जाहीर केला म्हणून शिधापत्रिका धारकांनी या दुकानांसमोर सकाळ पासूनच रांगा लावल्या. मात्र बोटांचे ठसे घेणारे पाॅश मशीनला रेंजच नसल्याने लाभार्थ्यांनी लावलेल्या रांगा दुपारपर्यंत तर काही ठिकाणी सायंकाळ पर्यंत पहावयास मिळाल्या. आता रेंज येईल मग रेंज येईल अशा अपेक्षेने गोरगरीब अन्नपाण्याशिवाय बसून राहिले.
शासनाने ठरविलेल्या उपक्रमात शिधापुरवठा दुकानदारांना मात्र हकनाक लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे प्रकारही बहुतेक ठिकाणी पहावयास मिळाले. एरव्ही धान्य वाटप करताना पुर्ण दिवसभर रेंज गायब असते. त्याहीवेळेस शिधापत्रिका धारकांना वाट पाहत बसावे लागते तर या घाईगडबडीत ठरवलेल्या उपक्रमावेळी शासनाने रेंजच्या बाबतीत सक्षम असावयास हवे अन्यथा पाॅश मशीनशिवाय अन्य वेगळी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मत गोरगरीब जनतेतून व्यक्त होत आहे. मोठा गाजावाजा करत आनंदाचा शिधा सर्वसामान्य जनतेला देण्याचा आनंद शासनाने घेतला पणं गोरगरिबांना पदरात घेताना पोटात खड्डा मात्र नक्कीच पडला. 

Related Articles

Back to top button