ठळक बातम्या

… तर पंतप्रधान पदाचा अपमान ठरेल?

निळवंडे प्रकल्पाचा राजकीय स्वार्थासाठी लोकार्पण करून लाभक्षेत्रातील जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार- पवार

राहुरी : गेल्या 53 वर्षांपासुन रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण असताना देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा घाट घातला जात आहे. हा त्यांच्या पदाचा अपमान ठरेल. केवळ राजकीय स्वार्थासाठी लोकार्पण करून लाभक्षेत्रातील जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी करू नये? लोकार्पणाची घाई कशासाठी असा प्रश्न लाभधारकांना पडला असल्याचे निळवंडे कृती समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांनी सांगितले आहे.

निळवंडे धरणाचा सात कोटी रुपयांचा प्रकल्प आजमितीस 5177 कोटी रुपयांवर पोहचला आहे. आज पर्यंत निळवंडे धरणासाठी 2400 कोटी खर्च करण्यात आला आहे. निळवंडेची अद्याप 2600 ते 2700 कोटी रुपयांची कामे बाकी आहे. कामे पुर्ण होई पर्यंत हा खर्च वाढण्याची शक्यता आहे, असे असताना देखील लोकार्पण घाट घातला जात आहे.

निळवंडे डाव्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले असले तरी टेल कॅनॉल व इतर शाखा कालव्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामेही अद्याप सुरू झालेले नाही. गेट व इतर पी डी एन चाऱ्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून सर्वेक्षणाचे काम अंतिम झालेले नाही.

निळवंडे उजव्या कालव्याचे मुख्य कालव्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. उजव्या कालव्याची वापरायोगी चाचणी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत पी डि एन चाऱ्यांची कामे पूर्ण होऊन शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. तोपर्यंत प्रकल्प पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. प्रकल्पावरील निम्म्याहून अधिक खर्च बाकी आहे. प्रकल्पाच्या कामाचा कालावधी वाढला तर प्रकल्पाचा खर्च 8000 कोटी पर्यंत जाऊ शकतो. प्रकल्पच पुर्ण नसताना लोकार्पणाची घाई कशासाठी ? हा प्रश्न लाभधारकांना पडला आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासारख्या केंद्राच्या योजना मधून निळवंडे प्रकल्पासाठी एक रुपयाही मिळालेला नाही, असे असताना लोकार्पण कशाचे करता? लोकार्पण करुन केवळ राजकीय स्वार्थ साधण्याचा घाट घातला आहे. अपूर्ण निळवंडे प्रकल्पाचा पंतप्रधान यांच्या सारख्या उच्च पदाच्या नेत्यांच्या हस्ते लोकार्पण करुन पंतप्रधान यांची अवहेलना करू नये, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button