अहमदनगर

मतमाउली जन्मदिनी स्थानिक धर्मगुरूंचे अभिवादन

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : ८ सप्टेंबर रोजी पवित्र मारिया[मतमाउली]च्या जन्मदिनी सकाळीच प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी यांनी मतमाउली भक्तीस्थानासमोर प्रार्थना करून, मतमाउलीचे दर्शन घेतले व अभिवादन केले.
दुसऱ्या शनिवारी सालाबादप्रमाणे जन्मोत्सव होत असतो. याही वर्षी ११ सप्टेंबर रोजी ऑनलाईन साजरा होणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च महाराष्ट्रातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान मतमाउली भक्तिस्थान येथे पवित्र मरीयेच्या सन्मानार्थ ७३ व्या मतमाउली यात्रोत्सवनिमित्त सर्व धार्मिक कार्यक्रम सरकारच्या कोविड नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्यात येणार असल्याने भाविकांनी ऑनलाइन दर्शन व भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.
यात्रा पुर्व नऊ शनिवारी नोव्हेना भक्ती झाली. दिनांक १ सप्टेंबर रोजी यात्रा शुभारंभ झाला व जन्मोत्सव पर्यंत ९ दिवस नोव्हेना भक्ती होत आहे. दि.११ सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रोत्सव दिनी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डानियल यांचे दुपारी १२ वा. प्रवचन व सणाची मिस्सा होईल. कोविड १९ विषाणू प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता”matmaulibhaktisthan या यु ट्यूब प्रसार माध्यमाव्दारे सर्व कार्यक्रम प्रक्षेपित होतील. त्याचा लाभ घरी राहून घ्यावा ज्या भाविकांना आपले नवस पूर्ण करावयाचे असतील व पवित्र मिस्सा अर्पण करायचा असेल त्यांनी प्रमुख धर्मगुरूशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.
कोरोना प्रादुर्भाव व शासनाच्या आदेशाचे पालन करून गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही मतमाउली यात्रा भरणार नाही.यांची भाविकांनी नोंद घ्यावी. याबाबत उंदीरगाव व ग्रामपंचायत हरिगाव योग्य ती दक्षता घेत आहेत व सूचना फलकांव्दारे देत आहेत. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, चर्च संलग्न सर्व संघटना आदींनी केले आहे.

Related Articles

Back to top button