औरंगाबाद

अखेर पैठण शिक्षक पतसंस्थेनेही स्वीकारला ‘कन्नड पॅटर्न’!

शिक्षक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दणदणीत यश!

विलास लाटे/पैठण : पैठण तालुका शिक्षकांच्या पतसंस्थेचे सुमारे ७७९ सभासद आहेत. मात्र यापूर्वी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या भरभक्कम विम्यासाठी कुठलीही ठोस तरतूद करण्यात आलेली नव्हती. याबाबत शिक्षक सेनेच्या पैठण शाखेच्या शिष्टमंडळाने शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील कन्नड शिक्षक पतसंस्थेचा अभ्यासदौरा पूर्ण करून तेथील ‘मयत कल्याण निधी’ व ‘अपघात विमा’ या योजनांची सखोल माहिती घेऊन त्याच्या अहवालावर आधारित योजना जशाच्या तशा पैठण शिक्षक पतसंस्थेत सुरू करणे बाबत आक्रमकपणे मागणी लावून धरत निवेदन दिले.

तसेच पतसंस्थेच्या २६ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देखील या मुद्यावर जोर लावून शिक्षक सेनेच्या सभासदांकडून दबाव निर्माण करून मागणी लावून धरण्यात आली होती. अखेरीस काल रविवारी १० ऑक्टोबर रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत  संचालक मंडळाला शिक्षक सेनेच्या मागणी समोर गुडघ्यावर टेकुन मागणी मान्य करावीच लागली.

आता पतसंस्थेच्या सभासदांच्या वर्गणीतून प्रतिवर्षी तीन हजार रुपये कपात करून सभासदांपैकी एखाद्या सभासदाची कोणतीही दुर्दैवी घटना घडली अथवा नैसर्गिक मृत्यू आला तरी यासाठी अकरा लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे. तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून जुनी पेन्शनधारक सभासदांचा २० लाख रुपयांचा तर नवीन पेन्शनधारक सभासदांचा ३० लाख रुपयांचा अपघाती विमा देखील शिक्षक सेनेच्या मागणीप्रमाणे लागू करण्यात येणार आहे. 

गेल्यावर्षी अपघात विम्यातून संचालक मंडळ मिळवत असलेल्या कमिशनचे जाहीर भांडाफोड शिक्षक सेनेने केल्यानंतर व मिळवत असलेल्या कमिशन पैकी ३५ हजार रुपये संस्थेच्या खात्यात जमा करायला भाग पाडल्याने आता खडबडून जागे होत संचालक मंडळाकडून मागील वर्षीपेक्षा कमी विमा हप्त्यांमध्ये अधिक विम्याची तरतूद केली गेली.

शिक्षक सेनेने याबद्दल सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आलेल्या यशाबद्दल तालुकाभरातील सभासदांकडून शिक्षक सेनेचे विशेष कौतुक होत आहे. आजवर सभासदांचा कुठलाही विचार होत नसल्याने शिक्षक सेनेच्या कन्नड अभ्यासदौऱ्याचे फलित म्हणून पतसंस्थेने ‘कन्नड पॅटर्न’ स्वीकारण्यास सुरुवात केल्याने सभासदांमध्ये उमेद निर्माण झाली आहे.

शिक्षक सेनेच्या मागणीच्या अनुषंगाने पतसंस्थेचे अध्यक्ष आबासाहेब कणसे यांनी मागणी मान्य केल्यामुळे शिक्षक सेनेच्या वतीने अमोल एरंडे, महेश लबडे, कैलास मिसाळ, अमोलराज शेळके, पांडुरंग गोर्डे, लक्ष्मण गलांडे, शिवाजी दुधे, देविदास फुंदे,आजिनाथ दहिफळे, युनुस शेख, श्रीकांत गमे, मोहन घरगणे, गजानन नेहाले, महेश उकरडे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

मार्च मध्ये पैठण शिक्षक पतसंस्थेने लागू केलेली सहा  लाखांची अन्यायकारक व मयत कल्याण निधी ही योजना शिक्षक सेनेने सुज्ञ सभासदांच्या साथीने प्रचंड विरोध केल्याने बंद करावी लागली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने कन्नड पतसंस्थेच्या धर्तीवर लागू करण्याची मागणी केली होती. तसा अहवाल संचालक मंडळास दिला होता. तो त्यांनी स्विकारून ,११ लाखांची योजना जाहीर केली. शिक्षक सेनेच्या दबावामुळे संचालक मंडळास निर्णय घेण्यास भाग पाडले.

      – अमोल एरंडे, तालुकाप्रमुख शिक्षक सेना पैठण

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button