औरंगाबाद

पावसाच्या जोरदार हजेरीने उडविली दाणादाण; शेतशिवार जलमय

 
दावरवाडी तांडा येथे कोंबडया मृत्युमुखी, पुरात शेळया वाहून गेल्या.

विजय चिडे/ पाचोड : शुक्रवारी मध्यरात्रीला मुसळधार पावसाच्या जोरदार हजेरीने सर्वत्र दाणादाण उडविली असुन सर्व शेतशिवार जलमय झाले. तसेच दावरवाडी तांडा (ता. पैठण) येथे घरात पाणी घुसल्याने पन्नासच्या वर कोंबडया मृत्युमुखी पडल्या तर चार शेळ्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

गतवर्षापासुन शेती हंगाम बेभरवशाचा खेळ आहे. कधी होत्याचे नव्हते होईल याचा नेम राहीला नाही. गत महीन्यापासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी,१ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक रौद्ररुप धारण केले. प्रचंड विजेच्या कडकडाट व ढगाच्या गडगडाटात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पाचोड (ता.पैठण) सर्वञ  हाहाकार उडाला. सलग पाऊण तास जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांत पाणी होऊन गावाकडे परतणाऱ्या नागरिकांचा अन् रस्त्याचा संपर्क तुटला. 

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक धो… धो पडलेल्या या पावसामुळे  हातातोंडाशी आलेले अन् अगोदरच पूर्णतः पाण्यात बुडालेले बाजरी,कापूस, तूर, ऊस, सोयाबीन आदी पिकांना पावसाच्या दोन दिवसाच्या उघडिपनंतर पुन्हा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात  नुकसान होऊन सर्वच पिके जमीनदोस्त झाली. या मुसळधार पाऊसाचे पुर ओसरत नाही तोच रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पुन्हा शनिवार (ता.दोन)च्या पहाटे सव्वापाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. अन् आतापर्यंत पडलेल्या पावसाचा उच्चांक मोडला गेला. नदी नाल्याच्या पाण्याने पात्राची मर्यादा ओलांडली.एकंदरीत या पावसामुळे खरीप हगामातील सर्वच पिके हातची जाण्याच्या मार्गावर आहेत. पाचोड महसूल मंडळात पावसाने थैमान घातल्याने केकत जळगाव, हर्षी, थेरगाव, लिंबगाव, दावरवाडी, नांदर, दादेगाव बु., मुरमा, कडेठाण, कोळी बोडखा, वडजी, रांजनगाव दांडगा, खादगाव, आंतर वाली (खांडी), आडगाव,नानेगाव आदी भागातील उभ्या पिकांना पावसाचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे असंख्य शेतातील माती खरडून गेली, शिवाय शेतातील बांधही पावसाच्या पाण्याने फुटून गेल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील इतर गावांतही पावसाने हजेरी लावली. गत दीड महीन्यापासून दररोजच रात्री तर कधी दिवसा पाऊस हजेरी लावत आहे. या पावसासह वाऱ्यामुळे गोदावरी पट्टयात उसाचे पिक जमिनीवर आडवे झाले. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने कपाशीला लागलेली बोंडे काळी पडून सडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नकसान झाले आहे.तर काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरीच्या कणसांना कोंब फुटत आहेत. एकंदरीत सर्वच पिके संकटात सापडली आहे. मागील आठवडयासह आजच्या पावसाचा कहर इतका जबरदस्त होता की, सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. नद्या, नाले ,तलाव, ओढे, पाण्याने तुडूंब भरून वाहीले. या पाण्या मूळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. मोसंबी, डाळिंबाच्या बागांत पाणी साचल्याने फळबांगाची मोठी हानी होणार आहे.

त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. सर्वत्र शेतांना तलावाचे तर पिकांतुन वाहणारे पाणी पाहून ‘त्या ‘ पाण्यास ओढ्याचे स्वरुप आल्याचे पाहवयास मिळते. दिवसेंदिवस फळबागांची अवस्था गंभीर होत चालली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वञ हाहाकार उडाला आहे. जिकडे पहावे तिकडे पाणी वाहत आहे. नदी, नाले तर प्रवाही झाले असून नद्या, विहीरी,नाले, तलाव, तुडूंब भरून  वरून वाहत आहे. सर्वत्र शेतीला अक्षरश: तळ्याचे स्वरुप आले आहे. दावरवाडी तांडा येथील संतोष राठोड यांच्या घरांत पुराचे पाणी शिरल्याने डालीखाली झाकलेल्या पन्नासवर कोंबडया मृत्यूमुखी पडल्या तर गोठ्यात मोकळ्या असलेल्या चार शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button